रुपककथा हा साहित्य-प्रकार काव्याशी फार मिळताजुळता आहे. थोड्या, परंतु लयबध्द शब्दांनी वातावरण उत्पन्न करायचे, वेचक पण चमत्कृतिजनक अशा कल्पनांनी सौंदर्य खुलवायचे आणि हे साधीत असतानाच विचार आणि भावना यांना आवाहन करून वाचकाला खर्याखुर्या जीवनाचा व जीवनमूल्यांचा साक्षातकार उत्कटतेने घडवायचा, हा रूपककथेमागचा मूलस्रोत असतो. .....आतापर्यंत मी जवळ जवळ चाळीस रूपककथा लिहिल्या असतील. निरनिराळ्या दृष्टींनी वाचनीय वाटणार्या त्यांतल्या काही निवडक कथांचा हा संग्रह. या सार्याच कथा अगदी माझ्या मनासारख्या उतरल्या आहेत, असे नाही; मूळ कल्पना आकर्षक असली, तरी तिचे सुंदर रुपककथेत रूपान्तर करणे हे काम सकृद्दर्शनी दिसते, तितके सोपे नाही. हस्तिदंताचा छोटा ताजमहाल करायला काही कमी कौशल्य लागते का? नाट्यछटा, व्यक्तिचित्र, लघुनिबंध यांच्यासारखाच रूपककथा हा आकाराने लहान, पण रंगत साधायला अवघड असा वाङ्मयप्रकार आहे; आणि तो साहित्याच्या सौंदर्यात आणि सामर्थ्यात नि:संशयपणे मौलिक भर घालीत असतो. माझ्या वाचकांना या रूपककथा निश्र्चितपणे आवडतील, असा मला विश्र्वास वाटतो.