‘सुखाचा शोध’ हे तर माणसाच्या जीवनाचे आद्य उद्दिष्ट आहे. तो शोध घेण्यात, ते मिळवण्यात काहीही गैर नाही. पण हे सुख पावसाच्या पाण्यासारखे निर्मळ, अकलंकित असावे, ते गटारीच्या डबक्यासारखे अस्वच्छ, आंधळी वासना, अत्याचार, निर्दयता, आक्रमक स्वार्थ इत्यादींनी दूषित झालेले नसावे, हे खांडेकरांनी ययातीत आणि अन्यत्रही वारंवार सांगितले आहे. मग या काळोखाच्या समुद्राला प्रकाशाचे किनारे कोठेच नसतात का? असतात. ते असतात म्हणूनच माणसाची जात धरतीवरून अद्याप नष्ट झालेली नाही अथवा होणारही नाही. हजारो-लाखो ययाती निर्माण होतात पण या ययातींच्या जमावातूनच एखादा कचही निर्माण होतो. शतका शतकांतून निर्माण होणारे हे कचच माणसाचे, मानवी संस्कृतीचे, त्याच्या भौतिक, अध्यात्मिक विकासाचे प्रवर्तक आणि राखणदार असतात. या कचांचे प्रकाशदायी अस्तित्व लोकांना जाणवून देणे, तुफानलेल्या समुद्रातही हे अचल दीपस्तंभ माणसांसाठी उभे आहेत असे आश्वासन त्यांना देणे हे खांडेकरांच्या विचाराचे प्रमुख वैशिष्ट्य आणि बलस्थान आहे.