प्रज्ञेचे नि प्रतिभेचे ईश्वरी देणे ज्याला जन्मापासून लाभले होते, पण यशाच्या उन्मादामुळे अन अनैसर्गिक स्वैराचारामुळे ज्याने आपली लोकप्रियता आणि जीवन ऎन तारुण्यात धुळीला मिळविले, अशा एका अलौकिक साहित्यिकाची आणि कलावंताची ही भयानक शोककथा आहे. ...ह्या कलावंताचे नाव ऑस्कर वाइल्ड. मनुष्याचे सारे दोष त्याच्याबरोबरच नाश पावतात आणि कीर्तिरूपानेच तो चिरंतन होतो. कालिदासाबद्दल गडकरी म्हणतात: "चुकल्या तरुणा, वेश्याक्रीडन आज तुझे स्मरणात नसे, कालिदाससकॄत श्रीशाकुंतल सरस्वतीच्या कंठि वसे!" त्याप्रमाणेच आपल्याला ऑस्कर वाइल्डबद्दल म्हणता येईल की, शारीरीक सुखोपभोगाच्या स्वैर हव्यासामुळे त्याने आपल्या हयातीत स्वत:चा कितीही अध:पात करून घेतला, तरी हास्याचा नि अश्रूंचा ऊर्जस्वल उग्दाता म्हणून जगाच्या साहित्यात ऑस्कर वाइल्शचे नाव अजरामर राहील यात तिळमात्र शंका नाही!