आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तववादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समग्र जीवनाचा चित्रदर्शी आलेख मांडण्यात श्री.सदानंद देशमुख यांची लेखणी यशस्वी ठरली आहे.एरवी सामान्य वाटणा-या स्त्री-पुरुषांना आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या भावविश्वात लीलया प्रवेश करुन; त्याचे जगण्याचे छोटे-मोठे प्रश्न, हर्षामर्ष, स्वप्न आणि स्वप्नभंग, त्यांची अभावग्रस्तता, संघर्ष, घुसमट, वेदना आणि विद्रोह यांचा भेदक वेध घेऊन वाचकांनाही या जगण्याचा ते प्रत्ययकारी परिचय करुन देतात. मानवी जीवनाबद्दल असणारा अंत:स्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यास; यामुळे सदानंद देशमुख यांचे साहित्य नैतिक उंचीवर जाते. त्याच्या ’रगडा’ या संग्रहातील कथा आणि दीर्घकथा लक्षवेधी ठरल्या आहेत. ’साहित्य अकादमी’ आणि ’जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ यांच्यासारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री.सदानंद देशमुख यांचा ’रगडा’ हा कथासंग्रह आहे.