Akshardhara Book Gallery
Venkatesha ( वेंकटेशा )
Venkatesha ( वेंकटेशा )
Share
Couldn't load pickup availability
Author: Anjali Daskhedkar
Publisher: Madhushree Publication
Pages:
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
प्रेम, विरह, ओढ, माया, काळजी, सुख-दुःख, करुणा, कर्तव्य आणि वचनपूर्ती ह्या भावभावना साक्षात नारायणालाही चुकल्या नाहीत. तो देखील ह्या भावना जगतो, अनुभवतो आणि निभावतो. परंतू जेव्हा तो निभावतो तेव्हा समस्त संसारासाठी तो एक आदर्श ठेवतो.
ही गोष्ट आहे अश्याच भावभावनांची, नात्यांची, प्रेमाची, प्रतिक्षेची.... वेंकटेशाची !
वाचा वेंकटेश अवताराची संपूर्ण कथा.
या पुस्तकाचे लेखक : अंजली दासखेडकर, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

वेंकटेशा - अंजली दासखेडकर
पुस्तक परीक्षण - ओंकार बागल
प्रकाशन - मधुश्री प्रकाशन
पृष्ठ संख्या - २७० पाने
वेंकटेशा..वेंकटेशा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो...अशा शब्दांनी शेवट झालेली ही कादंबरी. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. कोणतीही गोष्ट अकारण घडत नसते, त्यामागे एक ना अनेक पैलू दडलेले असतात किंवा एखादी साखळी पूर्ण होण्यासाठी एका मागून एक अशा घटना घडत असतात. अगदी वैज्ञानिक संकल्पनेतून सांगायचं तर माणसाचं जीवनचक्र आणि त्याची साखळी असते तसं. संपूर्ण कहाणी कुणालाच माहित नसते, जो तो आपापल्या अनुभवांना प्रमाण मानून जगत असतो.
सांगण्याचा मुद्दा इतकाच की ईश्वराने या पृथ्वीतलावर अनेक अवतार घेतले. प्रत्येक अवतार घेण्यामागे त्याचे विशिष्ट प्रयोजन राहिले आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही भारताचे अतिशय लोकप्रिय महाकाव्य आहेत, त्याद्वारे कृष्ण आणि राम सर्वांपर्यंत पोहोचले. मात्र बाकी इतर अवतार आणि त्यांच्या कथा अजूनही कित्येकांना माहित नाहीत. म्हटलं तर हा भारताचा युगायुगपासूनचा इतिहास आहे. अगदी काहीच नाही तर महाकाव्य या प्रमाणातूनसुद्धा या कथांची आणि प्राचीनतेची ख्याती सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन ही कादंबरी वाचकांसमोर सादर करण्यात आली आहे. 'वेंकटेशा' या कादंबरीतून अंजली दासखेडकर यांनी अशाच एका नारायण अवताराची, तिरुपती बालाजी अवताराची संपूर्ण कहाणी चितारली आहे.
तिरुपतीस्थित बालाजी अवतार, त्याला जोडून असणाऱ्या इतर गोष्टी, संबंधित कथा, कहाण्या आणि त्यामागील कारणे, अशा बऱ्याच गोष्टी बारकाव्यानिशी या कादंबरीतून वाचायला मिळतात. लोकांपर्यंत आणि मराठी वाचकांपर्यंत ही कहाणी कादंबरीस्वरूप पोहोचली ही सर्वप्रथम उल्लेखनीय बाब. काही कहाण्या, ज्या बोलीस्वरुपातून, मौखिक स्वरूपातून प्रचलित असतात त्या इतिहासाच्या कालौघात हरवून जातात. पुराणकथांच्या बाबतीत ही स्वाभाविक होणारी गोष्ट असल्याने ती लिखित आणि अतिशय सुंदर कादंबरीद्वारे वाचकांसमोर प्रस्तूत झाली, हे उत्तम झाले. या कादंबरीत क्रमानुसार विविध युगातील अवतारांबद्दल सखोल विवेचन करण्यात आलेले आहे.
अध्यात्मिकतेची आवड असणाऱ्यांना तर ही कादंबरी आवडेलच आवडेल. शिवाय कोणत्याही वाचकाला माहितीपर आणि गोष्टीस्वरूप वाचायला केव्हाही उत्तम. अगदी लहान मुलांना गोडी लावण्यासाठी ही कादंबरी नेहमीच एक छान पर्याय असेल. या कादंबरीला केवळ अध्यात्म आणि पुराणकथेवर आधारित असणारी कादंबरी इथपर्यंत मर्यादित ठेवणे, कधीच योग्य होणार नाही. कोणत्याही पुराणकथा त्यातील काही सबबींमुळे भाकड वाटत असल्या तरी त्यातील प्रमाण आणि तार्किकता कधीही कमी होत नाही. ही कादंबरीदेखील त्याच अनुषंगाने खूप सुरेख रचली आहे. बालकृष्ण, राम अवतार, देवी सीता, वराहस्वामी, वेदवती, पद्मावती, वेंकटेश, बकुळा या पात्रांद्वारे अनेक गोष्टींचा यातून खुलासा करण्यात आलेला आहे.
संपूर्ण कादंबरीत विविध युगांतील जे धागेदोरे आहेत ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुंफलेले आहेत. अर्थात भावनिक साद, ही त्यामागची खरी धारणा असल्याची प्रचिती प्रत्येक वेळी आणि प्रत्येक युगाच्या शेवटाला येत राहिली आहे, हेच अंतिम सत्य. राम, सीता यांच्याशी एकरूप झालेलं, इतिहासात विरून गेलेलं, अन्नभिन्न राहिलेलं एक पात्र म्हणजे 'वेदवती'. या पात्राबद्दल कादंबरीतून बराचसा उलगडा होतो. रामायणातील कित्येक महत्वाच्या घटनांवरदेखील याद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी तिरुपती हेच निवासस्थान का? त्या ठिकाणाला आणखी काय महत्व आहे? वेंकटेश तिकडे का आणि कसे पोहोचतात? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे कायम वास्तव्य का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे यातून वाचायला मिळतात.
भारताच्या प्राचीन काळापासून मातृत्व आणि स्त्रीत्वाला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व या कादंबरीतून प्रकर्षाने जाणवत राहतात. कर्म, कर्तव्य आणि भावना एकसुरात वाहत ठेवण्याची परंपरा वाचकाच्या मनात साठून राहील. बकुळा आणि वेंकटेश यांच्या संवादातून बौद्धिक द्वंद, मनातील रितेपणा आणि मानवी जन्मातील अडसर हळुवारपणे कमी झाल्यासारखे वाटतील. मुळात कोणताही अवतार ही संकल्पना मानवाला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठीच आहे, हे लक्षात येत राहील. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे कादंबरीच्या शेवटी असलेला वेंकटेश आणि पद्मावतीचा विवाहसोहळा. या सोहळ्याचे वर्णन इतक्या भन्नाट पद्धतीने लिहिले आहे जणू वाचणारा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवत असल्यासारखे वाटते.
चारही युगांचा विलक्षण प्रवास करून आणणारी ही कादंबरी. कृष्ण, बलराम, यशोदा, देवकी, नंदबाबा, कंस, राम, सीता, रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत, हनुमान, ब्रह्मदेव, वराहस्वामी, वेदवती, पद्मावती, बकुळा, वेंकटेश अशा पात्रांनी भरलेल्या कादंबरीचा अनुभव अतिशय आल्हाददायक आणि भावनाप्रधान आहे. प्रेम, विरह, भावना, नाते, कर्म, कर्तव्य, बंधने, वचनपूर्ती, भावनिक साद, माया, ममता, करूणा, दुःख, विरह, वेदना अशा सर्व पाशांचा याद्वारे उलगडा होत राहील. हे लिखाण साध्या, सोप्या शब्दांत, वाचकांना रुचेल अशा स्वरूपात आहे. कित्येक ठिकाणी अगदी अवघड, बोजड लिहिणं टाळून रसाळ शब्दांत विवरण केले गेले आहे. पुराण कथांतील संदर्भ व त्यातील मतितार्थदेखील तर्कशुध्द आहे.
प्रत्येक युगातील अवताराची, प्रेमाच्या भावनिकतेची आणि वेंकटेशाच्या प्रकट होण्याची ही कहाणी मानवाला अनेक उच्चतम जीवनमूल्ये शिकवून जाते. माणसाला मानवी देहात जगताना लागणारी सारी रीत सांगून जाते. 'वेंकटेशा' या कादंबरीतून वाचकाला मिळणारा आनंद अगदी निराळा आहे. अतिशय मधाळ आणि विविधांगी पैलूंनी परिपूर्ण अशी ही कादंबरी तिच्या सर्व पानांवर वाचकाला खिळवून टाकणारी आहे. शेवटी एकच म्हणावसं वाटेल, "वेंकटेश सर्वांच्या इच्छा पूर्ण करो."
-©ओंकार दिलीप बागल
9321409890
[****]
Insta ID - bookbandhu_reviews