Akshardhara Book Gallery
Mewadcha Singh (मेवाडचा सिंह)
Mewadcha Singh (मेवाडचा सिंह)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rohan Benodekar
Publisher: Snehal Prakashan
Pages: 249
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मेवाडचा सिंह
मातृभूमीशी नातं, तलवारीशी निष्ठा, आणि स्वराज्यासाठी अखंड झुंज.. तो झुकला नाही, थकला नाही, त्याचं ध्येय होतं मावळतीऐवजी प्रकाश बनणं.. ही कथा आहे त्या महाराणाची गाथा, ज्याच्या पायांत आणि विचारांना बेड्या नव्हत्या.. होता तो फक्त स्वाभिमानाचा साज ! एक अशक्यप्राय स्वप्न जगलेला राजा-मेवाडचा सिंह.. महाराणा प्रताप ! नवोदित तरुण लेखक रोहन बेनोडेकर याची ही दुसरी कादंबरी, स्नेहलतर्फे सर्व इतिहास प्रेमींसाठी भेट..
लेखक. रोहन राजेंद्र बेनोडेकर
प्रकाशक. स्नेहल प्रकाशन

मेवाडचा अजरामर इतिहास!
शब्दांच्या धारेतून अनुभवलेला रणसंग्राम!
इतिहास हा केवळ तारखा आणि युद्धांचा नसतो, तर तो असतो स्वाभिमानाचा आणि शौर्याचा. मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि स्वाभिमानासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या वीरांचा इतिहास नेहमीच अंगावर रोमांच उभा करतो. मेवाडचे नाव निघताच डोळ्यांसमोर येतो तो असीम त्याग, शौर्य आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणारा इतिहास. आपला देश गुलामगिरीत ढकलला जात असताना, स्वातंत्र्याचा आदित्यध्वज अभिमानाने उंच ठेवणारे मेवाड.
हा गौरवशाली इतिहास लेखक रोहन बेनोडेकर यांनी 'मेवाडचा सिंह' या पुस्तकातून अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे भारतीय इतिहासातील एका जाज्वल्य आणि स्वाभिमानी अध्यायाचे अत्यंत प्रभावी शब्दांकन आहे. मेवाडचा इतिहास, तिथल्या राजांचा पराक्रम आणि त्यांचा त्याग याविषयी सांगणारे हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. हे पुस्तक प्रामुख्याने मेवाडच्या त्या योध्यांवर प्रकाश टाकते ज्यांनी परकीय आक्रमकांसमोर कधीही शरणागती पत्करली नाही. दिल्लीच्या सुलतानांनी आणि मुघलांनी संपूर्ण भारतावर आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, परंतु मेवाडचा 'एकलिंगजी'चा आशिर्वाद घेतलेला भगवा ध्वज कधीही झुकला नाही.
लेखक रोहन बेनोडेकर यांनी या पुस्तकात केवळ युद्धांचे वर्णन केले नाही, तर त्यामागील रणनीती, मेवाडची संस्कृती, आणि तिथल्या मातीतील राष्ट्रभक्तीची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली होती, हे अधोरेखित केले आहे. कठीण काळातही धैर्य कसे टिकवून ठेवावे, हा मुख्य उद्देश आहे. गनिमी कावा आणि डोंगराळ भागाचा वापर करून मोठ्या शत्रूला कसे चकवावे, या युद्धकौशल्याचा यात समावेश आहे.
लेखकाने ऐतिहासिक व्यक्तींची रेखाटने इतकी सुंदर केली आहेत की, ती पात्रे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात. युद्धाच्या वेळी तिथली जंगले, डोंगर आणि किल्ले यांनी सैन्याला कशी साथ दिली, याचे भौगोलिक वर्णन छान आले आहे. वीरांना लढायला पाठवणाऱ्या माता आणि पडद्यामागे राहून राज्याची धुरा सांभाळणाऱ्या स्त्रियांचा त्यागही यातून नमूद केले आहे. यात केवळ युद्धाचा थरार नाही, तर पराभवाचे दुःख, जंगलातील हालअपेष्टा आणि विजयाचा आनंद अशा सर्व भावनांचा समतोल साधला आहे.
पुस्तकात अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक पात्रांना न्याय देण्यात आला आहे. पुस्तकाचा मुख्य गाभा अर्थातच महाराणा प्रताप यांच्याभोवती फिरतो. त्यांचा स्वाभिमान, जंगलात राहून पत्करलेले कष्ट आणि अकबरासारख्या बलाढ्य सम्राटाला दिलेली टक्कर याचे अतिशय प्रेरणादायी वर्णन पुस्तकात आहे. महाराणा प्रतापांचा निष्ठावंत घोडा 'चेतक' याच्या बलिदानाचा प्रसंग वाचताना वाचकाचे डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत. महाराणा प्रतापांसाठी प्राणांची आहुती देणारे 'झाला मानसिंग' आणि आपली संपूर्ण संपत्ती देशासाठी दान करणारे दानशूर 'भामाशाह' यांच्यासारख्या उपेक्षित किंवा कमी चर्चिल्या गेलेल्या पात्रांवर लेखकाने सुंदर प्रकाश टाकला आहे.
लेखकाने पुस्तकाचे लेखन करताना संदर्भांची योग्य काळजी घेतली आहे, ज्यामुळे पुस्तकाची विश्वासार्हता वाढते. महाराष्ट्रातील वाचकांना शिवराय आणि बाजीराव पेशवे यांचा इतिहास चांगला ठाऊक असतो, परंतु त्याच तोडीचा मेवाडचा इतिहास इतक्या सविस्तरपणे मराठीत आणण्याचे कौतुकास्पद काम रोहन बेनोडेकर यांनी केले आहे. हे पुस्तक केवळ भूतकाळातील गोष्टी सांगत नाही, तर आजच्या पिढीला राष्ट्रप्रेम आणि निष्ठा याचा मंत्र देते. गोष्टीसारखी मांडणी असल्यामुळे हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपते. यातून अनेकांना माहीत नसलेले छोटे ऐतिहासिक प्रसंगही समोर आणले आहेत.
राजवाडा सोडून जंगलात राहताना राजा आणि त्यांच्या कुटुंबाची झालेली मानसिक ओढाताण खूप उत्तमरीत्या मांडली आहे. शत्रू जरी मुघल असले, तरी ते सुद्धा या राजाच्या पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा मनातल्या मनात आदर करायचे, हा वेगळा दृष्टिकोन यात दिसतो. भील समाजाने राजाला दिलेली साथ आणि त्यांची तीरंदाजी या पुस्तकात महत्त्वाची भूमिका बजावते. युद्धात अनेकदा माघार घ्यावी लागूनही, त्या पराभवाचे रुपांतर नव्या जिद्दीत कसे करायचे, ही एक वेगळी जीवनशैली यातून शिकायला मिळते.
पुस्तकात काही महत्त्वाच्या प्रसंगांचे नकाशे, प्रमुख पात्रांची तोंडओळख पुस्तकात समाविष्ट केली. पुस्तकाच्या शेवटी २ परिशिष्ट सामाविष्ट केले आहे, ज्यात महाराणा प्रतापांच्या तपशील दिलेला आहे. याशिवाय काळ-सूचीदेखील दिलेली आहे. महाराणा प्रताप आणि छञपती शिवाजी महाराज यांचा सहसंबंध याचादेखील संदर्भ आला आहे. लेखकांनी शौर्यासोबतच त्याग आणि दुःख या भावनिक बाजूही सुंदर टिपल्या आहेत. पात्रांचे बोलणे अतिशय प्रभावी असून लेखन अगदी सोपे आणि प्रवाही आहे, कुठेही कंटाळवाणे वाटत नाही.
पहिल्या पानापासूनच वाचक पुस्तकात पूर्णपणे गुंतून जातो. जुना इतिहास आधुनिक वाचकाला आवडेल अशा फ्रेश पद्धतीने मांडला आहे. त्यांच्या लिखाणात क्लिष्टता वाटत नाही. लेखक आपल्याला थेट शेकडो वर्षे जुन्या कालखंडात घेऊन जातात. लेखणी थेट मनाला भिडते. पराभवाचे वर्णन करतानाही लाचारी दाखवली नाही. प्रत्येक प्रकरणाचा शेवट खिळवून ठेवतो. जन्मभूमीशी असलेले सैनिकांचे घट्ट नाते शब्दाशब्दांतून जाणवते. पात्रांच्या भावना थेट आतपर्यंत पोहचतात.
रोहन बेनोडेकर यांचे 'मेवाडचा सिंह' हे पुस्तक इतिहासप्रेमींसाठी एक अनमोल ठेवा आहे. इतिहासाच्या पाऊलखुणांवर शब्दांचा असा काही साज चढवला आहे की, वाचन संपते पण मनातील शौर्याचा थरार संपत नाही. इतिहासप्रेमी आणि दर्जेदार वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे देखणे लेखन आहे. आजच्या तरुण पिढीला आपल्या वैभवशाली आणि संघर्षाने भरलेल्या इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या वीरांचा हा इतिहास प्रत्येक मराठी घराघरात पोहोचायला हवा.
-©ओंकार दिलीप बागल
9321409890
Insta ID - bookbandhu_reviews
महाराणा प्रताप यांच्या जीवनावरील आधारित ही कादंबरी, लेखकांनी अगदी सुंदर रित्या सादर केली आहे. जास्त माहिती देण्याचा पर्यंत , सुंदर भाषा, बारकावे, विस्तृत तपशिल, अश्या बऱ्याच गोष्टी आहेत. नक्की वाचा, मी suggest करेन. 5⭐
@bookish_nk