Akshardhara Book Gallery
Patyara (पटयारा)
Patyara (पटयारा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Santosh Nago Shinde
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 288
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
पटयारा
टोकाची प्रतिकूलता आणि त्यात ‘काहीच करू शकत नाही', या भावनेतून येणारी हतबलता माणसाला बहुतांशवेळा निष्क्रिय बनवते. अशी माणसं मग त्यांच्या आयुष्यात जिवंत राहण्यापलीकडे फारसं काही करू शकत नाहीत. मात्र परिस्थितीशी जुळवून घेत प्रतिकूलतेवर मात करण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वत:ची नवी वाट निर्माण करत जगणं अर्थपूर्ण बनवतात. त्याचं प्रतिबिंब म्हणजे ‘पटयारा' हे आत्मकथन होय.
वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्याच्या प्रयत्नात ढोर मेहनत करत आई मुलाला शाळेत घालण्यासाठी धडपडते. शिक्षणाची ओढ आणि वाचनाची गोडी लागलेला मुलगा आईची होणारी ओढाताण कमी करण्यासाठी परिस्थितीच्या रेट्यातून स्वत:लाही कामाला जुंपतो. पण कोणी काहीही म्हटलं, कितीही अपमान केला तरी शिक्षण आणि वाचनात खंड पडू न देण्यासाठी निगरगट्टपणा, कोडगेपणा यातून येणारं पटयारापण तो जपतो. त्याच पटयारापणातून रेखली जाते एक नवी वाट, जी संतोष शिंदे यांना धुळ्यासारख्या दुर्गम भागातून पुण्यापर्यंत घेऊन येते. इतकंच नाही, तर एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उच्च पदावर बसवून जगभराचा प्रवास घडवते. त्याचीच ही प्रेरक गोष्ट...
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

संतोष नागो शिंदे यांच्या ‘पट्यारा’ या पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायचा म्हटलं, तर माझं मत असं आहे की हे पुस्तक अतिशय सुंदर आणि प्रभावी पद्धतीने लिहिलेलं आहे. यात खूप सोपी, सहज आणि आकर्षक भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पुस्तकातील प्रत्येक प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो आणि प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचावं असं वाटतं.
लहानपणी असं म्हणायचे की झोप येत नसेल तर पुस्तक वाचायला घ्या, आणि ते घेतल्यानंतर खरंच झोप लागायची. पण संतोष नागो शिंदे यांच्या पट्यारा बाबतीत मात्र अगदी उलट अनुभव येतो—झोप तर सोडा, साधी जांभईही येत नाही. एक प्रकरण संपलं की पुढचं प्रकरण वाचण्याची उत्सुकता लागून राहते, आणि मग एकामागून एक पान आपोआप पलटत जातं. वेळ कधी निघून जातो, हे कळतच नाही.
माझ्या मते, हे फक्त पुस्तक नाही, तर साहित्याची भूक असलेल्या वाचकांसाठी संतोष नागो शिंदे यांनी सजवलेली एक सुंदर थाळी आहे. या थाळीतील प्रत्येक प्रसंग साहित्यप्रेमींची भूक भागवण्यास पूर्णपणे सक्षम आहे. म्हणूनच मी या पुस्तकाला आणि लेखकाच्या लेखणीला ⭐⭐⭐⭐⭐ पाच स्टार देतो.
संतोष चे हे पुस्तक आज पूर्ण वाचून झाले,
जीवनपट उलगडतांना, व शब्दांकित करतांना,क्षणो क्षणी ,
संतोष माझ्या समोर च आहे जणु ,
असे वाटत होते.
सहज सोपी पण प्रभावशाली भाषा
मना ला भावली.
जीवन हे काट्या कुपाट्यातून कसे
बहरते ,याची जाणीव पदोपदी होते.…
‘पटयारा’ हे आपले पुस्तक अत्यंत मनापासून आवडले. कुठलीही कटुता किंवा आक्रोश न ठेवता, प्रांजळ, प्रवाही आणि साध्या भाषेत केलेले हे आत्मकथन वाचकाला सहजपणे आपल्या अनुभवांच्या जगात घेऊन जाते.
लेखनात कृत्रिमतेचा अंशही जाणवत नाही; उलट प्रत्येक प्रसंग हा प्रामाणिकपणे आणि संयमाने मांडलेला आहे.
आपल्या विपुल वाचनामुळे आलेली वैचारिक प्रगल्भता आणि जीवनातील मूलभूत मूल्यांविषयीची स्पष्ट समज, पुस्तकातील प्रत्येक पानावरून जाणवते.
ही ‘Basic Fundamentals’ केवळ विचारांतच नाहीत तर आपल्या आचरणात आणि व्यक्तिमत्त्वातही खोलवर मुरलेली आहेत, हे वाचताना पदोपदी प्रकर्षाने जाणवत राहते.
म्हणूनच हे आत्मकथन केवळ वैयक्तिक अनुभवांपुरते मर्यादित राहत नाही, तर वाचकाला विचार करायला लावणारा जीवनानुभव बनते.
आपल्या लेखनातील साधेपणा आणि प्रामाणिकता हीच या पुस्तकाची खरी ताकद आहे.
#पटयारा #PATYARA
‘पटयारा’ वाचलं...
वाचताना पुस्तक वाचून संपे पर्यंत खाली ठेवावं वाटत नव्हतं..!
खरं आहे.. बुद्धिमत्ता सचोटी, सच्चेपणा,सहनशीलता, सातत्य आणि परिश्रम घेण्याची वृत्ती असेल तर यश निश्चित आहे..🌈
लेखन उत्कृष्ट!
मी पुस्तक वाचते आहे असं वाटत नव्हतं, तर प्रत्यक्ष आत्मकथन ऐकते आहे असंच वाटत होतं..
#पटयारा #PATYARA
संतोष नागो शिंदे!
"पट्यारा " पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लेखकाच्या नावाची ही अक्षरे दिसत राहतात, जो पर्यंत पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर राहते.
पुण्याच्या Grow More Coach च्या मीटिंग च्या वेळी मी पहिल्यांदा भेटले, आणि त्यांनी मला पुस्तक भेट दिले. पुस्तकावर जो फोटो छापला आहे, प्रत्यक्षात मला तो तसाच दिसला. अत्यंत साधेपणा आणि आत्मविश्वासपूर्ण वावर, आणि लहान मुलासारखे हास्य चेहऱ्यावर. एक प्रकारचे औत्सुक्य वावरण्यात, असे मला जाणवले. पहिल्या भेटीत जाणवले ते पुस्तक वाचल्यावर पटले.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि मलपृष्ठावर जे लिहिले आहे ते मी पुन्हा लिहीत नाही. ते सगळे तसेच आहे. अनेकांच्या वाट्याल असे बालपण आले आहे, पण सगळेच या टप्प्यावर पोचले नाही.
संतोष ची गोष्ट अतिशय साधी सरळ आहे आणि म्हणूनच ती मनाला भिडते. अत्यंत प्रामाणिकपणाने सगळे भाव व्यक्त करत तो गेलाय. हि गोष्ट वाचून मला असे वाटले की आजही आणि कायमच शिक्षण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या परिस्थितून बाहेर काढायला मदत करते. त्याला पर्याय नाही. माझ्या मताने संतोष 'वाचनाचे वेड' ही दैवी देणगी म्हणून घेऊन जन्माला आला. आणि स्वतःवर संस्कार करत गेला. असंख्य क्षणी पुस्तक हातातून टाकून संतोष परिस्थिती समोर हार मनू शकला असता, पण तो पुढे जात राहिला केवळ पुस्तकांनी दिलेल्या शहाणपणाने. लेखनाची देणगी सुद्धा तो घेऊन आला. किती सहज त्याने हे सगळे आपल्या समोर मांडले.
जसे कठीण आयुष्य धीराने जगला त्यापॆक्षा अनेक पटीने जास्त अशा हिम्मतीने ते जगा समोर आणले. हि vulnerability जगणे सोपे नसते. त्याने ते केले.
प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात माणूसपणाची किंमत दाखवून दिली. Maslow च्या थेअरी चे जिवंत उदाहरण त्याने आपल्याला सादर केले.
व्यक्तिमत्व विकासाच्या टप्प्यातून प्रवास होत असताना त्याची जाणीव होऊन ती तो मांडू शकला हे केवढे यश आहे. बायको वर उगारलेल्या हाताची बोच, सामाजिक परंपरा आणि शिक्षणाने आलेली प्रगल्भता यातील घर्षण, अवघड बालपणातून मोठ्या झालेल्या मुलातील पुरुष आणि बाप, कळतंय पण वळत नाही अशी स्वतःच्या विकासातील मार्गक्रमणा या सगळ्या जाणिवा वाचक म्हणून तुम्हाला स्पर्श करून जातात.
आयुष्यात आलेली असंख्य वाईट माणसे आणि त्यापेक्षा अनेक पटीने आलेली चांगली माणसे तो निवडत गेला. आईचा प्रचंड विश्वास आणि प्रेम. बारी बाई सारख्या अनेक लोकांचा आशीर्वाद, पंकज सारखे अनेक जिवाभावाचे मित्र, सासऱ्याची दूर दृष्टी, माधुरीचे भाबडे प्रेम आणि विश्वास , देशपांडे सारखे भेटलेले अनेक हितचिंतक अशा अनेक लोकांनी ते आयुष्य समृद्ध झाले आणि तू तुझ्यातील "चॉईस " च्या कर्माने त्यातले चांगले ते वेचत गेलास. मजा आली वाचताना. म्हणजे कष्ट वाचून मजा नाही अली तर त्या सोप्या Story telling मुळे अनेक दिवसांनी वाचनाचा आनंद मिळाला. त्याची मजा आली.
खूप काही घेण्यासारखे आहे. सकारात्मकता, दुर्दम्य आशावाद, पुस्तकातील खजिना, माणुसकी ची ताकद, साधेपणात सोंदर्य, आणि वाहतेपणात असलेले आयुष्य. तुझ्या लिखाणाने तू ते अजून समृद्ध केलेस.
लिखाणाच्या देणगीला तुझ्या कष्टाने जे तू पैलू पडले आहेस त्या तुझ्याकडून भरपूर लिखाण होवो ही इच्छा आणि प्रार्थना करून मी थांबते. अनेक शुभेच्छा.
मला आनंद आहे कि मी तुला भेटले…!
--
Dr.Swapna Bhatawadekar
Baner,Pune
#Patyara #पटयारा